ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवल्यात वाळूच्या ट्रकवर ट्रेलर धडकला २ ठार, ७ जखमी

येवल्यात वाळूच्या ट्रकवर ट्रेलर धडकला २ ठार, ७ जखमी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, १९ मे, २०११ | गुरुवार, मे १९, २०११


येवल्यात वाळूच्या ट्रकवर ट्रेलर धडकला
२ ठार, ७ जखमी
येवला, दि. १८  - नगर-मनमाड राज्य महामार्गावर तालुक्यातील सावरगाव शिवारात आज पहाटे वाळूच्या उभ्या ट्रकवर ट्रेलर जाऊन धडकल्याने दोघेजण जागीच ठार तर सातजण जखमी झाले असून एकाला नाशिकच्या ग्रामीण रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ट्रेलरचा चालकही जखमी झाल्याचे वृत्त असून अपघातानंतर तो फरारी आहे.
पहाटे चारच्या सुमारास तालुक्यातील सावरगाव शिवारात कोपरगावहून अनकाई गावात वाळू घेऊन जाणारा ट्रक बिघाड झाल्याने बंद अवस्थेत उभा होता. त्याचवेळी येवल्याहून मनमाडकडे जाणारा ट्रेलर वाळूच्या ट्रकवर जाऊन धडकला. यावेळी वाळूच्या ट्रकवर व टपावरही मजूर झोपलेले होते. ट्रेलर धडकल्याने ट्रकने पलटी मारली व वाळूच्या ढिगार्‍यात ट्रकचा चालक व सर्व मजूर दाबले गेले. अपघाताचे वृत्त समजताच पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य संभाजी पवार यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन जेसीबी मशीन मागविली. जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाळूच्या ढिगार्‍यात अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले. अपघातात वाळूच्या ट्रकचा मालक व चालक गणेश ज्ञानेश्‍वर चव्हाण (रा. औद्योगिक वसाहत, कोपरगाव) याच्यासह बापू लकडू साबळे (रा. म्हसोबावाडी, रवंदा ता. कोपरगाव) हे जागीच ठार झाले. इतर सातजण जखमी झाले असून सुनील अन्साराम जगताप या गंभीर जखमी मजुराला नाशिकच्या ग्रामीण रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील सोमनाथ शिंदे, सुनील शिंदे, एकनाथ लोणारी यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. अपघाताचा तालुका पोलीस ठाण्यात भादंवि ३३७, ३३८, ३०४ (अ), २७९, १८४, ७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
काळ आलाच होता!कोपरगाव तालुक्यातून वाळू भरून हा ट्रक काल रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास येवला तालुक्याकडे निघाला होता. सदरचा ट्रक कोपरगाव - येवला या १८ किलोमीटरच्या अंतरात चार ठिकाणी बिघाड झाल्याने बंद पडला होता. मध्यरात्रीच्या सुमारास सदरच्या ट्रकला शहर पोलीस ठाण्याच्या रहदारी पोलिसांनीही अडविले होते. येथून सुटका झाल्यानंतर पुन्हा हा ट्रक मार्गस्थ झाला व पुन्हा येवल्यापासून नऊ किलोमीटर अंतरावरील सावरगाव शिवारात जाऊन बंद पडला होता. ट्रकमध्ये बिघाड झाल्याने बंद ट्रकमधील वाळूवरच अखेर सर्व मजूर व ट्रकचा मालक झोपी गेले. अखेर काळ आलाच होता म्हणून की काय बंद व उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन ट्रेलर धडकला व ट्रकच्या मालकासह आणखी एकाला घेऊन गेल्याची चर्चा आज दिवसभर होत होती.






Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity