ताज्या घडामोडी :

.

.
Home » » नगरसूल आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा तापाने मृत्यू व्हिसेरा नाशिकच्या लॅबला पाठविणार

नगरसूल आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा तापाने मृत्यू व्हिसेरा नाशिकच्या लॅबला पाठविणार

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, २१ ऑगस्ट, २०११ | रविवार, ऑगस्ट २१, २०११

येवला तालुक्यातील नगरसूल येथील संत नारायणगिरी महाराज आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा आज सकाळी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. सदर विद्यार्थिनी ही आश्रमशाळेत गेल्या 7 दिवसांपूर्वीच दाखल झाली होती. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची तक्रार दाखल करण्यात आली असून मृत विद्यार्थिनीचा व्हिसेरा तपासणीसाठी नाशिक येथील लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहे.
नगरसूल येथील अजिंक्यतारा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित संत नारायणगिरी महाराज आश्रमशाळेतील साक्षी संजय गायकवाड (11) हिचा आज नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. तिची शाळेत 17 व 18 ऑगस्ट रोजी तपासणी करण्यात आली होती. थंडीतापाच्या आजाराने ती गेल्या चार दिवसांपासून त्रस्त होती. तिच्यावर काल नगरसूलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून तिला सोडून देण्यात आले होते. आज सकाळी तिची तब्येत आणखीनच बिघडल्याने वसतिगृहाचे अधीक्षक विकास दत्तात्रय जिरे यांनी तिला पुन्हा नगरसूलच्या प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तिचा
सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. वसतिगृहाचे अधीक्षक जिरे यांनी या घटनेची तालुका पोलीस ठाण्यात तत्काळ खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी रुग्णालयात जाऊन भेट दिली. भादंवि 174 अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी दाखल केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय साबळे, पोलीस हवालदार वाघ, किरण ढेकरे हे करीत आहेत. मृत साक्षीचे नगरसूल येथेच ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर तालुक्यातील नांदूर येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत साक्षीचे आईवडील हे तालुक्यातील नांदूर या गावातील पोल्ट्री फॉर्मवर मजुरी करतात. ते कोपरगाव तालुक्यातील कोकमठाणचे मूळ रहिवाशी आहेत. 11 ऑगस्ट रोजी साक्षी गायकवाड ही तिचा एक भाऊ व एका बहिणीसह नगरसूल येथील शाळेत दाखल झाली होती व वसतिगृहातच राहत होती. चौथीत शिकणार्‍या साक्षीच्या अकस्मात मृत्यूने शोककळा पसरली होती.
सोमवारपासून आरोग्य तपासणी मोहीम राबविणार - गटविकास अधिकारी रवींद्र परदेशी
नगरसूल येथील घटनेनंतर गटविकास अधिकारी रवींद्र परदेशी यांनी आज दुपारी 1 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन पाहणी केली. यानंतर प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना आपण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी मोहीम सोमवारपासून राबविणार आहोत अशी माहिती दिली. गटशिक्षणाधिकार्‍यांना याबाबत आजच आपण आदेश दिले असून गंभीर आजार असणार्‍या विद्यार्थ्यांची वेगळी यादी करून सर्व शिक्षा अभियानांतर्गत ज्या विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांच्यावरच त्वरित उपचाराची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षी तालुक्यातील गंभीर आजार असलेल्या 13 विद्यार्थ्यांवर सर्व शिक्षा अभियानांतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहितीही परदेशी यांनी यावेळी दिली.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity