ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवलेकरांचे बंधारे कोरडे ठेवून पिण्याचे पाणी बोटिंग क्लबला!

येवलेकरांचे बंधारे कोरडे ठेवून पिण्याचे पाणी बोटिंग क्लबला!

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, १० जानेवारी, २०१३ | गुरुवार, जानेवारी १०, २०१३

येवला- तालुक्यात पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. अशातच डिसेंबरच्या अखेरीस पालखेड डाव्या कालव्याने पिण्याच्या पाण्यासाठी सोडलेल्या आवर्तनात 19 टंचाईग्रस्त गावातील बंधारे भरून देण्याची मागणी तालुका स्तरातून होत असताना धरणातील कमी साठवणुकीच्या नावाखाली या बंधार्‍यांना पाणी भरून देण्यात आले नाही. 38 गाव नळपाणीपुरवठा योजनेचा साठवण तलावही पूर्ण क्षमतेने भरून दिलेला नाही; मात्र पालकमंत्र्यांच्या मर्जीसाठी व समाधानासाठी अंगणगाव या टंचाई नसलेल्या गावातील बोटिंग क्लबचा बंधारा भरून देऊन मंत्रीमहोदयांनी येवलेकरांची दुष्काळात चेष्टा केली आहे, अशी टीका तालुका शेतकरी संघटनेचे नेते संतू पा. झांबरे व भाजप नेते धनंजय कुलकर्णी यांनी संयुक्तपणे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

आजवर पाटबंधारे प्रशासन नेहमीच येवला तालुक्यावर पाटपाण्याचे नियोजन करताना घोर अन्याय करत आले आहे, असे असताना पालकमंत्रीही येवला तालुक्यावर प्रशासनाच्या तंत्राने वागून अन्याय करीत असल्याची भावना तालुक्यात वाढीस लागली असल्याचे सांगून झांबरे व कुलकर्णी असे म्हणाले की, पालखेड डाव्या कालव्याने पिण्याच्या पाण्याचे रोटेशन 21 डिसेंबरला दिले. त्यात 38 गाव पाणीपुरवठय़ाच्या साठवण तलावात फक्त 9 दशलक्ष घनफूट पाणी भरून देण्यात आले. प्रत्यक्षात त्यांची मागणी 25 दशलक्ष घनफूट होती, तर येवले शहर साठवण बंधार्‍यात येवले नगरपालिकेने 30 दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी येवला न. पा.ने केली असताना 28.27 दशलक्ष घनफूट पाणी भरून देण्यात आले, म्हणजेच या दोन्ही योजनांतील साठवण बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्यात आले नाही; मात्र त्याच रोटेशनमध्ये पालकमंर्त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी पालिका प्रशासन व पाटबंधारे प्रशासन यांनी संयुक्तपणे अंगणगाव येथील पालकमंत्र्यांच्या नावाने असलेला बोटिंग क्लबचा तलाव मागणी नसतानाही 2.42 दशलक्ष घनफूट पाणी देऊन भरून दिला. 'अंधेर नगरी, चौपट राजा' अशातलाच हा प्रकार असल्याचे झांबरे व कुलकर्णी म्हणाले.

या बोटिंग क्लबला जेवढे पाणी दिले तेवढे पाणी येवले शहरासाठी 15 दिवस पुरले असते. आज शहराला 5 दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे, असे असताना बोटिंग क्लबला पाणी देऊन पाण्याचा अपव्यय का करण्यात आला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आज शहरासह तालुक्याची पिण्याच्या पाण्याची अवस्था अत्यंत गंभीर आहे; मात्र त्याचे गांभीर्य ना प्रशासनाला आहे ना राजकत्र्यांना त्यामुळेच ही गंभीर परिस्थिती उद्भवली आहे, असे झांबरे व कुलकर्णी म्हणाले.

बोटिंग क्लब शासनाने देखभालीसाठी येवले नगरपालिकेला वर्ग केला व येवला न. पा. ने तो औद्योगिक वसाहतीकडे वर्ग केला असताना येवले शहराच्या हक्काच्या पिण्याच्या पाण्याने हा बोटिंग क्लबचा तलाव भरून देण्याची जबाबदारी का घेतली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity