ताज्या घडामोडी :

.

.
Home » » भुजबळांनी विश्‍वासघात केला!....................पाणी परिषदेत सर्वपक्षीयांची संतप्त टीका

भुजबळांनी विश्‍वासघात केला!....................पाणी परिषदेत सर्वपक्षीयांची संतप्त टीका

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २४ जानेवारी, २०१३ | गुरुवार, जानेवारी २४, २०१३

येवला  - आठ वर्षे झाली तरी कालव्याचे काम पूर्ण करू अन् पाणी तालुक्यातील डोंगरगावपर्यंत आणूनच दाखवू, तुम्ही फक्त माझ्या पाठीशी रहा, असा शब्द देणार्‍या भुजबळांकडून असलेली अपेक्षा मात्र फोल ठरल्याचे उद्विग्न उद्गार तालुक्यातील कसारखेडा येथे झालेल्या पाणी परिषदेत अनेकांनी काढले. भुजबळांनी आमच विश्‍वासघात केला, असा त्यांचा संतप्त सूर होता.
तालुक्यातील कसारखेडा येथे आज पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा कृती समितीची महिनाभरातील तिसरी पाणी परिषद झाली. पाणी परिषदेच्या अध्यक्षस्थानी देवचंद गायकवाड होते. येवल्यासाठी जिल्ह्यात धरणे झाली. मात्र पाण्याचा फायदा तालुक्यातील शेतकर्‍यांना झाला नाही. तालुक्यातील स्थानिक नेतेही पाणी प्रश्‍नावर बोलायला तयार नाहीत. पाण्यावर राजकारण झाले.
भुजबळांनी इमारती बांधल्या, रस्ते केले, परंतु पाण्याशिवाय तालुका विकासाचे ‘मॉडेल’ ठरू शकत नाही. केवळ आश्‍वासनाने काहीच होऊ शकत नाही, असे कालवा कृती समितीचे सदस्य बद्रीनाथ कोल्हे यांनी सुनावले. शरद पवार कुठेही असोत त्यांचे लक्ष बारामतीकडेच असते. तसेच लक्ष भुजबळांनीही येवल्याकडे द्यायला हवे. डोंगराळ पट्ट्याचा पाणीप्रश्‍न भुजबळांनी समजून घ्यावा. सत्ता आहे तर सत्तेच्या माध्यमातून तालुक्यात पाणी आणून स्थिती सुधारू शकता, असे आवाहन भाजप नेते भाऊ लहरे यांनी केले.
मतदारांनी तुम्हाला मते दिली आहेत. कुणीही येऊन तुमच्या वतीने उत्तर देईल, हे चालणार नाही. लोकप्रतिनिधी म्हणून भुजबळांचीच जबाबदारी आहे. अजित पवारांनी निधी अडवला आहे, असे म्हणता. मग आता आम्ही काय त्यांना मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी निमंत्रण द्यायचे का असा सवाल छावाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय सोमासे यांनी केला.
२००९ नंतर कालव्याचे काम थंडावले आहे. यापुढेही आंदोलन पाणी आल्याशिवाय थांबवणार नाही, असा इशारा संजय पगारे यांनी दिला.
भुजबळांसारखे नेतृत्व लाभूनही हा तालुका दुष्काळीच राहिला. आमची शेती पिकू द्या, अशी मागणी संतू पाटील झांबरे यांनी केली. भुजबळांनी स्वत: येऊन कालवा कामाबाबत आता उत्तरे देण्याची गरज आहे, असे विनोद पाटील म्हणाले.
भुजबळांच्या वतीने उत्तर देण्याकरिता पाणी परिषदेत बाळासाहेब लोखंडे हे प्रथमच उपस्थित होते. कृती समितीने भुजबळांकडे कालव्याच्या कामाबाबत प्रथम व्यथा मांडायला हव्या होत्या. ५० वर्षांचा हा बॅकलॉग आहे. भुजबळांना मतदारसंघात येऊन तर आठ वर्षे झाली आहेत, या शब्दात लोखंडे यांनी सारवासारव केली.
पाणी परिषदेत योगेश जहागीरदार, ऍड. सुभाष भालेराव, कौतिक पगार, गौतम पगारे, अशोक संकलेचा यांची भाषणे झाली. आगामी पाणी परिषद नगरसूल येथे १ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पाणी परिषदेत देण्यात आली. दिनकर लोहकरे, मोहन शेलार, रामा घोडके, विठ्ठल बोरसे आदी उपस्थित होते.

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity