ताज्या घडामोडी :
Home » » सर्व दुर्धर आजारांचे मुळ किटकनाशकात देवदरी येथे बहिनाबाई सप्ताहात विषमुक्त शेतीवर नाईकवाडी यांचे व्याख्यान

सर्व दुर्धर आजारांचे मुळ किटकनाशकात देवदरी येथे बहिनाबाई सप्ताहात विषमुक्त शेतीवर नाईकवाडी यांचे व्याख्यान

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८ | गुरुवार, ऑगस्ट २३, २०१८सर्व दुर्धर आजारांचे मुळ किटकनाशकात
देवदरी येथे बहिनाबाई सप्ताहात विषमुक्त शेतीवर नाईकवाडी यांचे व्याख्यान
 येवला : प्रतिनिधी
आज अस्तित्वात असलेल्या सर्व दुर्धर आजारांचे मुळ हे शेतीमाल पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या रासायनिक खते आणि किटकनाशकात आहे. या किटकनाशकांची अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्य यामध्ये उतरल्याने कर्करोगा सारखे आजार मोठ्या प्रमाणात फैलावत आहेत. यातून गरीब आणि श्रीमंत कोणीच सुटणार नाही. दिवसेंदिवस हे आजार बळावत जाणार असून केवळ सेंद्रिय शेतीच या आजारांपासून मानवाला वाचवू शकते, असे प्रतिपादन पंतप्रधान पारंपारीक कृषि विकास योजनेचे सल्लागार डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी केले.
खरवंडी-देवदरी येथील सिद्धेश्‍वर आश्रमात आयोजित संत बहिणाबाई महाराज यांचा ३९ वा फिरता अखंड हरिनाम नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी नाईकवाडी बोलत होते. याप्रसंगी ह. भ. प. मधुसुदन महाराज मोगल यांचे काल्याचे किर्तन झाले. मधुसुदन महाराजांच्या आदेशानेच हरिनाम सप्ताहात सेंद्रीय शेती विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यात्मिकते बरोबर शुद्ध व सात्विक आहाराची गरज असल्याचे महत्व ओळखुन मधुसुदन महाराजांनी विषमुक्त शेती या विषयावर नाईकवाडी यांना बोलण्याची विशेष परवानगी दिली होती. यावेळी बोलतांना डॉ. प्रशांत नाईकवाडी म्हणाले की, एकीकडे दिवसेंदिवस जमिनीचा पोत खालवलेला असून जमिनीतील क्षार दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच वेळी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. महागडे रासायनिक खते व किटक नाशके यामुळे शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडले आहे. मात्र, हा विषय केवळ शेतकर्‍यांच्या अर्थकारणाचा नसून अन्नधान्य खाणार्‍या प्रत्येक नागरिकांच्या आरोग्या विषयी आहे. किटकनाशकांमुळे पाणी, जमिन, पाळीव प्राणी यांच्यावर दुरगामी परिणाम होत आहेत. आज विविध अवयवांचे कर्करोग, मधुमेह, मज्जा संस्थेचे आजार, लहान बालकांचे मतिमंदत्व, महिलांचे गर्भशयाचे व स्तनाचे कर्करोग आदी आजार वाढत आहेत. तसेच तण नाशकांचा वाढता अनियंत्रित वापर, शेतजमिनीतील सेंद्रिय कर्बावर विपरीत परिणाम करीत आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात जमिन नापिकीचाही धोका संभवतो, असेही ते म्हणाले.
सेंद्रिय शेती म्हटले की, देशी गाईला पर्याय नाही. जमिन सुपिक करणार्‍या देशी गाईला चारा देतो म्हणून कृष्णाने गोर्वधनाची पुजा केली. पर्यावरण संतुलनाचा राज मार्ग दाखविला. कालिया मर्दन करुन यमुना नदी विषमुक्त केली. दुधाच्या रुपाने गोकुळात विष पाजणार्‍या पुतना राक्षशीनीला कृष्णाने मारले. आजही संकरीत गाई- म्हशींना पान्हा येण्यासाठी इंजेक्शन टोचले जाते. या इंजेक्शनमुळे  गाईला पान्हा येतो. म्हणजेच गाईला पुतना मावशीच बनवण्यासारखे आहे. त्यामुळे अशा इंजेक्शनमुळे पान्हावणार्‍या गाई, म्हशींचे दुध घेउ नका, यामुळे त्या मुक्या प्राण्यांना त्रास तर होतोच. त्याचबरोबर या जनावरांचे दुध पोटात घेणार्‍यांनाही मोठमोठ्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकर्‍यांनीही अशा कृत्रीम संप्रेरकांचा वापर करु नये. कारण जनतेचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी शेतकर्‍यांच्या माथी आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, माजी आमदार मारोतराव पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या सप्ताहास येवला, नांदगाव, वैजापूर, कोपरगाव, गंगापूर, निफाड आदी तालुक्यातील ३०० गावांमधून ५० हजाराचा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह यशस्वीतेसाठी खरवंडी व देवदरी येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

गोपाल काल्यात कॅन्सर मर्दनमचा जागर
श्री कृष्णाच्या काळात कालिया मर्दन म्हणजे पाण्यातील विष काढण्याचा प्रयोग होता. कृष्णाने कालियाचे मर्दन केले. तसेच कंसाचाही विनाष केला. आजचे कंस आणि चाणुर म्हणजे कॅन्सर आणि मधुमेह. या आजारांपासून सुटका हवी असेल तर शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा गो पालक कृष्णाच्या भुमिकेत जावे. देशी गाईच्या शेण, गोमुत्राचा वापर करुन जमिन विषमुक्त करावी. गाईने दिलेले दूध ही विषमुक्त करावे. जमिनीची सुपिकता, पर्यावरण संतुलन, स्वच्छ पाणी, तापमान कमी करणारी झाडांचे अच्छादन, भुजल साठा याचा योग्य वापर अशा विविध गोष्टींकडे शेतकर्‍यांनी लक्ष देऊन अन्नदाता म्हणून सात्विक व निरोगी आहार देण्याची भुमिका निभवावी, असेही डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी सांगितले.

अध्यात्मातुन सेंद्रिय शेती प्रबोधन व्हावे
केंद्र सरकार सेंद्रिय शेतीसाठी शेतकर्‍यांना प्रोत्सहन देत आहे. सेंद्रिय शेतमालाला योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जात आहे. निविष्ठा खरेदीसाठी सरकार प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या विचारात असल्याचे समजते. तसेच येत्या ५ वर्षात टप्या-टप्याने सर्वच विषारी रसायनांवर बंदी येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी नैसर्गिक संसाधनांचा वापर करुन विष मुक्त शेतीची कास धरली पाहिजे. विष मुक्त शेतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हरिनाम सप्ताह, किर्तने, प्रवचने आदी व्यासपिठांचा वापर करुन शेतकर्‍यांचे प्रबोधन केले पाहिजे.
- भागवतराव सोनवणे, संयोजक, जलहक्क संघर्ष समिती

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity