ताज्या घडामोडी :

.

.
Home » » मविप्रवर असलेले १४० कोटी रुपयांचे कर्ज कमी करू - एड. ठाकरे

मविप्रवर असलेले १४० कोटी रुपयांचे कर्ज कमी करू - एड. ठाकरे

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२ | सोमवार, ऑक्टोबर ०३, २०२२

मविप्रवर असलेले १४० कोटी रुपयांचे कर्ज कमी करू - एड. ठाकरे

पाटोदा येथे लवकरच महाविद्यालय

बनकरांमुळे निवडणूक सोपी

सभासद हिताच्या अनेक योजना राबवणार

येवला : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पाटोदा येथे अद्ययावत महाविद्यालय सुरू करण्या बरोबरच तालुक्यातील ज्या शाळांना इमारतींची आवश्यकता आहे, त्या शाळांनाही लवकरच इमारती उभ्या केल्या जातील. तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेवर गत संचालक मंडळाने तब्बल १४० कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा करून ठेवला आहे. संस्थेच्या डोईवरील हा कर्जाचा बोजा निश्चितच कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन मविप्रचे नवनिर्वाचित सरचिटणीस एड. नितीन ठाकरे यांनी केले.
 तालुक्यातील एरंडगाव येथील अंजनी सूर्य लॉन्स येथे मविप्रच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाचा सत्कार समारंभ जिल्हा सहकार चळवळीचे नेते तथा मविप्रचे माजी संचालक अंबादास बनकर, येवला संचालक नन्दकिशोर बनकर व बनकर कुटुंबियांकडून आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी उपस्थित सभासदांसमोर एड. ठाकरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सभासद द्वारकानाथ कोकाटे हे होते. एड. ठाकरे पुढे म्हणाले की, मविप्रमुळे सर्व समाजातील मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मविप्रचे सर्वच समाजातील विद्यार्थ्यांना सहकार्य केले आहे. त्यामुळे ही संस्था प्रगती पथावर रहावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यंदाची निवडणूक ऐतिहासिक झाली. कारण गत निवडणूकीत बनकरांना आम्ही पॅनेलमध्ये येण्यासाठी खूप गळ घातली, पण ते काही गळाला लागले नाहीत. ते जर गत निवडणुकीत आमच्या बरोबर असते, तर पाच वर्षांपूर्वीच आमच्या पॅनेलची सत्ता मविप्र मध्ये दिसली असती. मात्र बनकर खूप हुशार आहेत. त्यांची स्वतंत्र प्रचार यंत्रणा आहे. यंदाही ते गळाला लागेना, मात्र आम्ही खूप आग्रह केल्यानंतर त्यांनी आपले बंधू नन्दकिशोर बनकर यांना उमेदवारी घेतली. आमच्याकडे उमेदवारीसाठी मोठी गर्दी झाली होती, मात्र बनकरांना उमेदवारी देण्यासाठी आम्ही आग्रह धरला, तेव्हा कुठे त्यांनी होकार दिला, अन उमेदवारी आपल्या भावाला घेतली. त्यांच्या उमेदवारीने पॅनेलला ही निवडणूक सोपी गेली, असेही एड. ठाकरे म्हणाले. आता निवडणूक फिवर संपला आहे. संस्थेच्या विकासासाठी आम्ही झटणार आहोत. प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याबरोबरच नाठाळांच्या माथी काठी उगारावीच लागेल. भविष्यात संगीत शिक्षक, गत संचालक मंडळाच्या चुकांची दुरुस्ती, विनाअनुदानित वरील कर्मचाऱ्यांना अनुदानित वर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचेही एड. ठाकरे म्हणाले.
यावेळी अंबादास बनकर यांनी तालुक्यातील सर्वच शाळांना इमारती बरोबरच इतर सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असेल, असे सांगताना बनकर कुटुंबियांच्या वतीने एक लाख रुपये मदतीचा धनादेश सरचिटणीस एड. ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, संचालक संदीप राव गुळवे, डॉ. सयाजीराव गायकवाड, प्रवीण जाधव, एड. लक्ष्मणराव लांडगे, रवींद्र देवरे, शिवाजीराव गडाख, डॉ. प्रसाद सोनवणे, एड. रमेशचंद्र बच्छाव, विजय पगार, रमेश पिंगळे, श्रीमती शोभा बोरस्ते, जगन्नाथ निंबाळकर, येवला संचालक नन्दकिशोर बनकर आदी पदाधिकारी व  संचालक उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबादास बनकर यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब सोमसे यांनी केले. तर आभार प्रदर्शन जिल्हापरिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांनी केले.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity